दिवसाला १५०० रुपये व्याजाचा जाच… ३ लाखांवर १० लाखांहून अधिक वसुली… तरीही “व्याज बाकी” म्हणत शिक्षकाचा बळी!
लातूर, जि, प्र. (उत्तम माने )
लातूर -“पैसे संपले तरी त्यांची भूक संपली नाही…”
हीच वेदनादायक वास्तवता लातूर जिल्ह्यात उघड झाली आहे. खाजगी सावकाराच्या अमानुष जाचाला कंटाळून एका विशेष शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
पानचिंचोली (ता. निलंगा) येथील खाजगी सावकार उमेश गुंडेराव जाधव याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💣 दिवसाला १५०० रुपयांचा व्याजाचा सापळा
फिर्यादीनुसार, मृत शिक्षक सचिन रामराव सोनटक्के यांनी आर्थिक अडचणीतून फक्त ३ लाख रुपये घेतले होते. पण या रकमेवर सावकाराने दिवसाला तब्बल १५०० रुपये व्याज लावून कर्जाचे रूपांतर एका भीषण सापळ्यात केले.
कुटुंबाने जीव तोडून प्रयत्न केले—
शेती विकली…
उसने पैसे आणले…
फोनपे आणि रोख रक्कम दिली…
तरीही हा जाच थांबला नाही
१० लाख वसूल… तरीही “१३ लाख बाकी”चा दावा!
असल्याचा फिर्यादीत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे की, कुटुंबाने आतापर्यंत १० लाख ६५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम सावकाराला दिली होती. तरीदेखील आरोपी उमेश जाधव याने “अजून १३ लाख रुपये व्याज बाकी आहे” असा तगादा लावत धमक्या दिल्या.
इतकेच नाही, तर दबाव टाकून करारनामे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मानसिक छळाने संपलेले आयुष्य,
सततचे फोन, धमक्या, अपमान आणि आर्थिक दबावामुळे सचिन सोनटक्के पूर्णपणे खचून गेले.ज्यादिवशी कराररनामा लिहून घेतला त्यादिवशी अखेर त्यांनी लातूर येथील लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं.
एक कुटुंब उद्ध्वस्त झालं…
एक शिक्षक हरवला…
आणि सावकारीचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला.
“३ लाखांचं कर्ज… १० लाखांची वसुली… आणि शेवटी एका जीवाची किंमत!”
एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला…
एका शिक्षकाचा जीव गेला…
आणि पुन्हा एकदा सावकारीचा काळा चेहरा समाजासमोर आला!
पोलिसांचा तपास सुरू
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपीकडून इतर कोणाची फसवणूक किंवा छळ झाला असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पानचिंचोली गावात सावकारीच्या फासात अनेक कुटुंबांना अडकवून पिळवणुकीचा संशय..!
पानचिंचोली गावात खासगी सावकारीच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक जाळ्यात अडकवून त्यांची पिळवणूक करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाढते व्याज, वारंवार पैशांची मागणी तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याच्या चर्चा गावात सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणीत असलेल्या काही नागरिकांनी खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते. मात्र त्यानंतर ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक व्याज आकारले जात असल्याचा आरोप संबंधितांकडून केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये कर्जदारांवर दबाव टाकून वसुली केली जात असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गावात बेकायदेशीर सावकारीविरोधात संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सावकाराच्या जाचाला कंटाळून कुटुंबप्रमुखाने जीवन संपवल्याने चिमुकली लेकरं आणि पत्नी आज अक्षरशः उघड्यावर आली आहेत. घरातील एकमेव कमावता हात निघून गेल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली असून, लेकरांच्या डोळ्यांत आता फक्त अश्रू आणि उद्याच्या भाकरीची चिंता दिसत आहे.
सततच्या कर्जाच्या तगाद्याने आणि सावकाराच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वडिलांच्या मृत्यूनंतर दोन निष्पाप मुलांचे बालपण काळोखात ढकलले गेले आहे, तर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हाताला काम नाही, घरात अन्नाचा दाणा नाही आणि डोक्यावर संकटांचे सावट — अशा बिकट परिस्थितीत हे कुटुंब जगण्याची लढाई लढत आहे.
दरम्यान, सावकारीच्या वाढत्या जाचामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.












