प्रविण चिडे विरुर राजुरा तालुका प्रतिनिधी
देवाडा येथील घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर अनेकांनी घर बांधकामाचे काम सुरू केले असून फाऊंडेशनपासून ते सज्जा लेव्हलपर्यंतची कामे पूर्ण केली आहेत. मात्र अद्याप दुसरा हप्ता मिळाला नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत युवा काँग्रेस कार्यकर्ता जावेद मजीद अब्दुल यांनी प्रशासनाकडे तात्काळ दुसरा हप्ता वितरित करण्याची मागणी केली आहे.
घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या सूचनांनुसार बांधकामाची कामे वेळेत पूर्ण केली.अनेकांनी स्वतःकडील बचत तसेच उसने पैसे घेऊन घराचे बांधकाम पुढे नेले.परंतु दुसरा हप्ता रखडल्याने बांधकाम थांबण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून पुढील दोन दिवसांत रोहिण्या सुरू होणार आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गाला शेतीकामांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
देवाडा परिसरातील बहुतांश घरकुल लाभार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. घर बांधकामासाठी जवळची संपूर्ण रक्कम खर्च केल्यानंतर आता शेतीसाठी बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे घरकुलाचा दुसरा हप्ता तातडीने मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे जावेद मजीद अब्दुल यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जावेद मजीद अब्दुल म्हणाले की शासनाने गरीब व गरजू कुटुंबांना पक्के घर मिळावे या उद्देशाने घरकुल योजना सुरू केली आहे. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ निधी वितरित करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा.
दुसरा हप्ता त्वरित वितरित न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा देखील जावेद मजीद अब्दुल यांनी प्रशासनाला दिला आहे.














