✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर / राजुरा:– भारत निर्वाचन आयोगाने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत महाराष्ट्रात निवडणूक आयोगामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या प्रक्रियेकडे काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदान केंद्र प्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी केले आहे.

⏭️या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार केंद्र अधिकारी (बीएलओ) यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे मतदान केंद्र प्रतिनिधी (बीएलए) यांनी सक्रिय समन्वय ठेवून मतदार यादीतील नावे समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित, गावात सातत्याने गैरहजर रहाणारे, चुकीची अथवा दुबार नावे वगळणे, पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे आदी प्रक्रिया वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भारत रक्षक एसआयआर मोहीम राबविण्यात येणार असून, या अंतर्गत प्रत्येक बूथवरील बीएलए प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील काँग्रेसचे मतदान केंद्र प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला बळकटी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मा. सुभाषभाऊ धोटे पुढे म्हणाले की, मतदार नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपकडून केंद्र तसेच विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या मतदारांवर लक्ष केंद्रीत करून जाणीवपूर्वक मतदार यादीतील नावे कमी करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. विशेषतः महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये अशा तक्रारी पुढे आल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः राजुरा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचे प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघडकीस आनले होते. लोकशाहीच्या दृष्टीने मतदार यादी शुद्ध, अचूक आणि सर्वसमावेशक राहणे आवश्यक असल्याने काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः मतदान केंद्र प्रतिनिधींनी या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेकडे जातीने लक्ष देऊन जबाबदारीने काम करावे, असे आवाहन शेवटी जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे यांनी केले आहे.













