✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या 2004 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा बहुप्रतीक्षित स्नेहमेळावा दिनांक 23 मे 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी व भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणातील क्षण पुन्हा एकदा अनुभवले.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत अर्थपूर्ण उपक्रमाने करण्यात आली. संस्थेचे सचिव मा. श्री. लक्ष्मणराव धोबे व मान्यवर शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “झाडे लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत या उपक्रमाने स्नेहमेळाव्याला एक सामाजिक व प्रेरणादायी दिशा दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी व मनोगतपूर्ण प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. वर्षा गोरे यांनी केले. त्यांनी स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागील भावना व्यक्त करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. लक्ष्मणराव धोबे होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सदस्य श्री. विजयराव टोंगे सर, शाळेचे प्राचार्य श्री. जयंतराव टोंगे सर तसेच माजी वर्गशिक्षक श्री. ढूमणे सर, श्री. तनिरवार सर, महेशकर सर, गावंडे मॅडम, खोकले सर व अशोक उईके सर यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, शिस्त, संस्कार आणि मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, ज्यामुळे वातावरण अधिकच भावनिक झाले.
संपूर्ण कार्यक्रमात मैत्री, स्नेह, आनंद आणि आठवणींचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विविध उपक्रम, संवाद, हास्यविनोद आणि आठवणींनी भरलेला हा स्नेहमेळावा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अमित पोडे, सोनल डेंगळे,कमलेश खाड़े, प्रेम उपरे,प्रसाद पूंजेकर, जयश्री डाहूले, संकेत जयकर व सुभाष साव यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जुन्या मैत्रीच्या नात्यांना नवसंजीवनी मिळाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.














