चुनाळा येथूनच मिळणार वळसा- नागरिकांना तब्बल तीन किलोमीटर अतिरिक्त फेरा मारण्याची वेळ
⏯️राजुरा – बामणी रस्त्यावर राजुरा शहरासाठी सर्विस रोड देण्यात यावे : नगराध्यक्ष अरुण धोटे यांची शहरवासीयांच्या वतीने मागणी
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– राजुरा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात नागरिकांच्या सोयींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असून शहरासाठी स्वतंत्र सर्विस रोडची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात आज राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात शहरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी, पत्रकार, नागरिक यांच्या उपस्थितीत तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्या कार्यालयात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात या आधीही नगर परिषदेच्या वतीने तसेच स्थानिक नागरिक, शेतकरी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार यांनी लवकरच या संदर्भात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. तर यावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास महामार्गाचे काम बंद करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात शहरालगत सर्विस रोड देणे ही अत्यावश्यक सुविधा मानली जाते. मात्र राजुरा शहराजवळ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. परिणामी शहरात प्रवेश करण्यासाठी किंवा शहरातून बाहेर पडण्यासाठी वाहनचालकांना चुनाळा येथून वळसा घ्यावा लागत असून त्यासाठी जवळपास तीन किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. यामुळे इंधनाचा खर्च वाढत असून नागरिकांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर अत्यावश्यक सेवांना शहरात पोहोचण्यासाठी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सर्विस रोडची व्यवस्था करणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. परंतु संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने सर्विस रोडची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीने सुरक्षित व सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत राजुरा शहरासाठी सर्विस रोडची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.









