लातूर, जि. प्र.(उत्तम माने)
भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला खंडापूर शिवारातला संतांच्या पादुका दर्शन सोहळा आता थेट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दोन महिन्यांपूर्वी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य सोहळ्यावर आता कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होत आहेत—आणि त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.
✴️सोहळ्यासाठी जमा झालेल्या निधीपैकी तब्बल 5 ते 6 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा आयोजकांकडून केला जातोय. मात्र उरलेल्या पैशांचा हिशोब कुठे गेला, याचं स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. आयोजक समितीने थेट प्रमुख आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत.
आमदार, खासदार यांच्यासह काही राजकीय पक्षांनीही मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्याचा खुलासा होत असून हा आकडा थेट कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.
श्रद्धेच्या नावाखाली राजकारणाचा हस्तक्षेप वाढत चालल्याचा आरोप होत असून, या देणग्यांमागील उद्देश काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याने संत परंपरेचा अपमान होत असल्याची भावना वारकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, देणग्यांचा हिशोब पारदर्शकपणे जाहीर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा श्रद्धेच्या या सोहळ्यावर कायमचा डाग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संतांच्या पवित्र परंपरेभोवती निर्माण झालेल्या या वादामुळे आता समाजात संतापाची लाट उसळली असून, पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
“हिशोब द्या किंवा चौकशीला सामोरे जा!”
समिती सदस्यांचा संताप आता उफाळून आला आहे. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि अधिकृत तक्रार दाखल केली. निष्पक्ष चौकशीची मागणी करत त्यांनी प्रशासनावरही दबाव वाढवला आहे.
दरम्यान, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे—आरोपांच्या भोवऱ्यात असलेले प्रमुख आयोजक संपर्कातच नसल्याचा दावा केला जातोय. फोनला उत्तर नाही, स्पष्टीकरण नाही… यामुळे संशय आणखीच वाढत आहे.
श्रद्धेवर प्रश्नचिन्ह!
या प्रकरणामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “जिथे भक्ती असावी तिथे भ्रष्टाचार?” असा सवाल उपस्थित होत असून, वारकरी संप्रदायातही कुजबुज सुरू झाली आहे.
आता सर्वांचे डोळे पोलिस प्रशासनाकडे लागले आहेत.
या आरोपांमागचं सत्य बाहेर येणार का?
कोट्यवधींचा हिशोब स्पष्ट होणार का?
की हा प्रकारही वेळेच्या पडद्याआड जाणार?
या स्फोटक प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर सगळ्यांचं लक्ष खिळून राहिलं आहे.













