प्रविण चिडे विरुर तालुका प्रतिनिधी
बेर्डी–सीर्सी–खांबडा गट ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करून सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या काँग्रेसच्या मंदाबाई रवींद्र किनाके यांनी पोटनिवडणुकीत पुन्हा दमदार पुनरागमन करत सरपंचपद पटकावले आहे.
मंदाबाई किनाके यांच्या कारभारावर काही ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांना सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ग्रामपंचायत परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. विरोधकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मात्र, सरपंचपद रिक्त झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांतच पोटनिवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा जनतेसमोर जाण्याची संधी मंदाबाई किनाके यांना मिळाली. त्यांनी थेट गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधला.माझ्यावर खोटे आरोप करून अविश्वास ठराव आणण्यात आला.मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही, ना कायद्याविरोधात कोणतेही काम केले. माझी बाजू जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. असे त्या प्रचारादरम्यान सांगत होत्या.
ग्रामपंचायत सदस्यांनी जरी त्यांच्यावर अविश्वास दाखवला असला, तरी जनतेच्या न्यायालयात आपलाच विजय होईल, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यांच्या समर्थकांनीही गावोगावी प्रचार करत विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली.
या पोटनिवडणुकीत मंदाबाई रवींद्र किनाके (काँग्रेस) यांना 301 मते मिळाली तर त्यांची प्रतिस्पर्धी अनुराधा लक्ष्मण सोयाम (भाजप) यांना 223 मते मिळाली. तब्बल 78 मतांच्या फरकाने विजय मिळवत मंदाबाई किनाके यांनी पुन्हा सरपंचपदावर विराजमान होत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.
या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाके फोडले, गुलाल उधळला आणि विजयी मिरवणूक काढली. गावातील नागरिकांनीही हा निकाल विकासकामांवरील विश्वासाचा कौल असल्याचे मत व्यक्त केले.
मंदाबाई किनाके यांच्या पुनरागमनामुळे बेर्डी–सीर्सी–खांबडा गट ग्रामपंचायतीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आता गावाच्या विकासासाठी त्या कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














