✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेल्या Primary Response Team (PRT) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे मानधन अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. नियमितपणे जंगल संरक्षण व आपत्कालीन प्रतिसादाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अद्यापही मेहनतीचे योग्य मोबदले मिळालेले नाहीत. PRT अंतर्गत कार्यरत मजूर हे वन्यजीव संरक्षण, जंगलातील आग नियंत्रण, गस्त व इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असूनही त्यांचे वेतन वेळेवर दिले जात नसल्याने त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना ८ ते १० महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे घरखर्च, शिक्षण व दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. तसेच मागील दोन वर्षांपूर्वीचे जवळपास १५ महिन्यांपासूनचे मानधन सुध्दा अजून पर्यंत देण्यात आले नसल्याची तर वनविभागाकडे याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तर न देता मजुरांनाच उलट उत्तरे दिली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशा परिस्थितीत या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी महाराष्ट्र शासन व वनविभागाकडे पत्राद्वारे तातडीची मागणी केली आहे. थकीत वेतन त्वरित अदा करून PRT कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर यांनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे वरील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले होते हे विशेष.
स्थानिक पातळीवर प्रशासनाने या विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करावे, अशी मागणी जोर धरत आहे. वनसंवर्धनासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणे ही गंभीर बाब असून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.⏬⏬⏬⏬⏬








