सौ. संगीता खांडेकर यांच्या रूपाने चंद्रपूरला लाभले सुसंस्कृत नेतृत्व– आ. देवराव भोंगळे
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-दि. १०
नांद्याची लेक आणि चांद्याची महापौर” अशा शब्दांत सध्या चंद्रपूर शहराच्या नवनिर्वाचित महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे कौतुक होत आहे. नांदा (फाटा) हे माहेर आणि चंद्रपूर सासर असलेल्या संगीताताईंनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीच्या जोरावर चंद्रपूरच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील नांदा (फाटा) परिसरात आणि चंद्रपूर शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
💢सौ. संगीता खांडेकर यांचा राजकीय प्रवास हा अनुभवाने समृद्ध आहे. यापूर्वी त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ च्या सभापती म्हणून अत्यंत कार्यक्षमतेने जबाबदारी सांभाळली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीत त्या विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ (ना.मा.प्र. महिला गट) मधून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. विकासकामांचा ध्यास, जनसेवेची तळमळ आणि एक सुसंस्कृत, मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
🚨राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे पती तथा शहर भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. राजेंद्र खांडेकर यांच्या खंबीर साथीने त्या शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, आमदार देवराव भोंगळे यांच्या राजुरा मतदारसंघातील माहेर असलेल्या संगीताताई या आमदार भोंगळे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. ‘विकासाचा वादा, देवराव दादा’ हा मंत्र जपत जनसेवेसाठी धडपडणाऱ्या नेतृत्वाशी त्यांचे कौटुंबिक आणि राजकीय ऋणानुबंध जुळलेले आहेत.
चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या नियुक्तीने चंद्रपूर महानगरपालिकेला एक अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








