तेलंगणात चेकपोस्ट बंद, मग महाराष्ट्रात केव्हा?” – चालकांचा प्रशासनाला थेट सवाल
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:–आदिलाबाद राज्य महामार्गावर आरटीओ विभागाकडून ट्रक चालकांकडून कथित अवैध वसुली होत असल्याची गंभीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. रात्रंदिवस कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांच्या खिशाला जबर फटका बसत असल्याची भावना ट्रकचालकांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या सीमावर्ती भागात तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांकडून अनधिकृत रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप होत असून, यामुळे चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “आम्ही दिवसरात्र गाडी चालवून कुटुंबाचा संसार चालवतो, आणि तपासणीच्या नावाखाली आमच्याकडून पैसे घेतले जातात, ही अन्यायकारक बाब आहे,” असे एका चालकाने सांगितले.

दरम्यान, ⏯️तेलंगणा राज्यातील अनेक आरटीओ चेकपोस्ट बंद करण्यात आल्या असताना, महाराष्ट्रातील चेकपोस्ट केव्हा बंद होणार? असा सवाल ट्रक चालकांनी उपस्थित केला आहे. या कथित प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून होत आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासन व परिवहन विभाग कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








