कोरपना:-शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोरपना शहराला सध्या एका टोळीने वेठीस धरले आहे. ‘कार्यक्रमाच्या’ नावाखाली व्यापाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून उघडपणे खंडणी उकळणे आणि पैसे न दिल्यास तोडफोड करून दहशत निर्माण करणे, असा नवा धंदा या भामट्यांनी सुरू केला आहे. या टोळीच्या हैदोसामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, आता या खंडणी बहादरांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आली आहे.
💢कार्यक्रमाचा बनाव अन् खंडणीचा डाव!
गेल्या काही दिवसांपासून कोरपना शहरात सार्वजनिक कार्यक्रमांचे निमित्त साधून ही टोळी सक्रिय झाली आहे. “आम्हाला अमुक कार्यक्रमासाठी एवढी वर्गणी हवी,” असा सज्जड दम भरला जातो. मात्र, ही वर्गणी नसून ती सरळ-सरळ खंडणी असल्याचे समोर येत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी किंवा नागरिकांनी या टोळीच्या बेकायदेशीर मागणीला झुगारून लावले, त्यांच्या मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. या गुंडगिरीमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे भामटे करत आहेत.
✴️बांबू तट्टे विकणारा झाला ‘राजकीय’ खंडणीखोर!
या टोळीतील एका म्होरक्याची पार्श्वभूमी अत्यंत संशयास्पद आहे. जंगलातील बांबूचे तट्टे विकून उदरनिर्वाह करणारा हा इसम आज अचानक ‘राजकीय आश्रया’खाली गप्पा मारत आहे. वनविभागाच्या डोळ्यात धूळ फेकून, कोणताही शासकीय वाहतूक परवाना (TP) न घेता जंगलातील मौल्यवान बांबूची अवैध तोड आणि तस्करी करण्यात याचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. स्वतःला राजकीय नेता म्हणवून घेणारा हा भामटा प्रत्यक्षात शासकीय संपत्तीची लूट करून स्वतःची पोळी भाजत आहे.
रेती तस्करीचे जाळे आणि ‘अभय’ नावाचा वरदहस्त!
शहरात चर्चेत असलेले दुसरे नाव म्हणजे ‘अभय’. रेती तस्करीच्या अवैध धंद्यात याने आपले जाळे इतके घट्ट विणले आहे की, महसूल विभागालाही त्याने जुमानणे सोडले आहे. बेकायदेशीर रेती उपसा करून स्वतःच्या मालकीचे ‘हायवा’ आणि ‘ट्रॅक्टर’ रस्त्यावर उतरवणारा हा इसम नेमका कोणाच्या बळावर ही मग्रुरी करत आहे? असा प्रश्न जनता विचारत आहे. पवन आणि अभय या जोडगोळीने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते.
🚨नागरिकांचा संयम सुटला; पोलीस अधीक्षकांकडे होणार तक्रार!
या टोळीच्या जाचाला कंटाळलेले नागरिक आता एकत्र आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या टोळीच्या म्होरक्याविरुद्ध आणि त्यांच्या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस पुराव्यांसह एक मोठी फाईल तयार करण्यात आली आहे. लवकरच हे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेऊन या खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी करणार आहे. “जोपर्यंत या भामट्यांना तुरुंगाची हवा दाखवली जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.








