✍️ उतम माने
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर:-निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथे एका ६५ वर्षीय दलित शेतकऱ्याला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. केवळ शेती कसत असल्याच्या रागातून आरोपींनी शेतकऱ्याच्या शेतातील ११ बॅग हरभऱ्याची ‘बनीम’ (रास) पेटवून दिली, ज्यामध्ये सुमारे ३ ते ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कासार सिरसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
फिर्यादी कमलाकर चंद्रकांत कांबळे (वय ६५) हे गेल्या १० वर्षांपासून विजयकुमार पाटील यांची १६ एकर शेती बटईने कसत आहेत. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता कमलाकर हे शेतात असताना, गावातील नितीन सुभाष पाटील याने तिथे येऊन “तू लिंगायताची शेती कशी करतोस?” असे म्हणत त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि गचांडी धरून थोबाडीत मारले.
त्यानंतर सकाळी ८ वाजेच्या सुमारास, नितीन पाटील आणि ओम पाटील हे दोघे कारमधून (क्र. MH 12 TH 9247) कमलाकर यांच्या घरासमोर आले. त्यांनी कमलाकर यांना उचलून जमिनीवर आदळले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जेव्हा त्यांची पत्नी प्रभावती, मुलगा आनंद आणि सून पूजा हे वाचवण्यासाठी आले, तेव्हा आरोपींनी त्यांनाही निर्दयीपणे मारहाण केली.
मारहाणीनंतर आरोपींनी भररस्त्यात धमकी दिली आणि शेतात जाऊन साठवून ठेवलेली हरभऱ्याची ११ पोत्यांची बनीम पेटवून दिली. या आगीत शेतकऱ्याच्या कष्टाचे पीक खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.⏬⏬⏬⏬⏬








