लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
निलंगा : विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि कोट्यवधींचे प्रेरणास्थान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त निलंगा शहरासह संपूर्ण तालुका अभिमान, जल्लोष आणि कृतज्ञतेच्या भावनेने दुमदुमून गेला. ठिकठिकाणी ध्वजारोहण, अभिवादन, मिरवणुका, सामाजिक उपक्रम आणि आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
पहाटेपासूनच शहरात जयभीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. निलंगा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष संजयराज हलगरकर, मुख्याधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उपासक-उपासिका, आबालवृद्ध, महिला, युवक तसेच बालक-बालिकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलंगा बसस्थानकातही जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. आगारप्रमुख अनिल बिडवे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर निलंगा आगारातील सर्व चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना वंदन केले. लाल परी बस आकर्षक सजवून भव्य जयंती सोहळा साजरा करण्यात आला. हा अनोखा देखावा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरला.
तालुक्यातील तळीखेड येथे आम्रपाली बौद्ध विहार परिसरात सकाळी साडेनऊ वाजता सर्व बौद्ध उपासक-उपासिका तसेच विविध समाजघटकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगितले.
केळगाव येथेही जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार बालाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात डॉ. हिरालाल निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा मंजु निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सायंकाळी शहरातील अशोकनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर, आनंदनगर आदी भागांतील जयंती उत्सव मंडळांच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, जयभीमच्या घोषणा, निळ्या झेंड्यांची शान आणि आकर्षक देखावे यामुळे संपूर्ण शहर निळेमय झाले होते. अनेक ठिकाणी नागरिकांना नाश्ता, पाणी व अल्पोपहार वाटप करून सेवा उपक्रमही राबविण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा जागर निलंग्यात सर्वत्र दिसून आला. त्यांच्या जयंतीनिमित्त निलंग्याने पुन्हा एकदा बाबासाहेबांविषयीचा अपार आदर, प्रेम आणि निष्ठा जगासमोर दाखवून दिली.







