लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
लातूर : श्रद्धा, विश्वास आणि पारदर्शकतेच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवहारांवर आता मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. संतांच्या पादूकांशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या हिशोबावरून लातूरमध्ये संतापाची लाट उसळली असून, “हे सगळं सरळ सरळ गोलमाल आहे!” अशी तिखट प्रतिक्रिया भाविकांकडून उमटत आहे.
“मी माझ्या खर्चाने आलो, माझी टीम आणली, प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला… आणि शेवटी माझा काहीच संबंध नाही असं सांगितलं जातं? मग हा पैसा गेला कुठे?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात किशोर महाराज शिवणीकर यांनी सर्व माल आणि आर्थिक व्यवहार स्वतःकडे घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
वाद अधिक चिघळवणारी बाब म्हणजे कदम माऊली यांचे विधान. “हिशोब हवा असेल तर त्यांच्याकडेच मागा,” असे त्यांनी स्पष्ट सांगत जबाबदारी झटकली, आणि त्यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे. जनतेत आता एकच चर्चा — “जबाबदारी कुणाची? आणि सत्य लपवलं जातंय का?”
भाविकांचा आक्रोश स्पष्ट आहे: संतांच्या नावावर कोट्यवधींची उलाढाल होत असेल, तर त्याचा हिशोबही तितक्याच पारदर्शकपणे मांडला गेला पाहिजे. अन्यथा, हा केवळ विश्वासघातच नव्हे तर श्रद्धेचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
❌सध्या तरी संबंधितांकडून मौन बाळगण्यात येत आहे. मात्र, “सब गोलमाल है… भाई, सब गोलमाल है!” हा घोष आता लातूरच्या रस्त्यावर घुमू लागला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा हा वाद आणखी भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.













