वार्ताहर : प्रविण चिडे, विरुर स्टेशन
विरुर परिसरातील कमल किसान सेवा इंडियन पेट्रोल पंप तब्बल आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात एकमेव पेट्रोल पंप असल्यामुळे वाहनधारकांसमोर पर्यायच उरलेला नाही. परिणामी, नागरिकांना बाहेरील भागातून लिटरमागे तब्बल ५० रुपये अधिक दराने पेट्रोल खरेदी करावे लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
दररोज कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक,शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे अनेकांना लांबच्या गावांमध्ये जावे लागत असून त्यात वेळ आणि पैशांचा दुहेरी अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, पंप चालकाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
फक्त मशीन बिघाडामुळे ८ दिवस पेट्रोल पंप बंद राहणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असून,याला पेट्रोल पंप चालकाची जबाबदारी ठरते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विरुरसारख्या वाढत्या गावात एकच पेट्रोल पंप असून तोही वारंवार बंद राहणे ही गंभीर बाब आहे. जर पंप चालक योग्य सेवा देत नसेल, तर संबंधित प्रशासनाने त्यांचा परवाना रद्द करून दुसऱ्या सक्षम व्यक्तीस पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी द्यावी.
दरम्यान, महागड्या वाहनांची संख्या वाढत असताना इंधन उपलब्ध नसणे ही मोठी विसंगती असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गाड्या घेतल्या, पण पेट्रोलच मिळत नसेल तर आम्ही काय करायचे? असा संतप्त सवालही काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून पेट्रोल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे. विरुर परिसरातील नागरिक आता या समस्येच्या तातडीने निराकरणाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
















