✍️दत्तात्रेय बोबडे
संपादक यवतमाळ
वणी:-लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत बल्लारपुर मध्ये “सत्यशोधक पद्धतीने” एक अनोखा लग्न सोहळा पार पडला आहे. फुलांच्या अक्षता,पुस्तकांचा आहेर-माहेर, पुस्तकांचा रुखवत आणि लग्न मंडपात वीर सैनिकांच्या पत्नींचा सत्कार असा आगळा-वेगळा विवाह बल्लारपूर या ठिकाणी संपन्न झाला आहे.
‘लग्न ‘ ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक अनिष्ट प्रथा, कालबाह्य ठरलेल्या रुढी आणि त्यातून होणारे आर्थिक शोषण यांना जणू खतपाणी घालण्याचे कामच या विवाह संस्कृतीने बळकट केल्याचे दिसते. कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा या गोष्टीं मुळे अनेक विवाह समारंभांच्या आनंदाला गालबोट लागताना आपण पाहत आलो आहोत. या सर्व अनिष्ट प्रकारांना ‘महात्मा जोतिबा फुले’ यांनी सत्यशोधक चळवळीचा सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय दिला.मात्र दिखाऊपणाच्या या जगात याला फारसे कोणी महत्त्व देत नाही. बल्लारपूर तालुक्यातल्या
“संत तुकाराम महाराज सभागृह” या ठिकाणी पुरोगामी विचार व शेतकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील व खुटेमाटे यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने “सत्यशोधक विवाह सोहळा” संपन्न झाला आहे.
उच्च शिक्षीत जोडप्याने निवडला सत्यशोधक विवाहाचा मार्ग
बल्लारपूर तालुका येथील श्री नरेंद्र पाटील खुटेमाटे यांचे चिरंजीव “प्रशांत” आणि श्री दशरथ कान्होबा बोबडे (पाटील) यांची कन्या “प्राजक्ता” यांचा विवाह निश्चित झाला,पण हा विवाह सोहळा “सत्यशोधक पद्धतीने” करण्याचा निर्णय दोन्ही नव दांपत्यांनी घेतला होता. शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या उच्च शिक्षित जोडप्याने सर्व रूढी-परंपरांना बाजूला सारत,महात्मा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीच्या मार्गाने नव्या संसाराची सुरुवात केली आणि संत तुकाराम महाराज सभागृह, बल्लारपूर या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला.

असा पार पडला,अनोखा लग्न सोहळा
डॉ.दाभोलकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,जिजाऊ डॉ.बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकोबाराय यांचे फोटो लग्न मंडपाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये वधूचे आईवडिल प्रतीकात्मक पध्दतीने उपस्थित होते. तर यावेळी लग्न मंडपात नवरा आणि नवरीचे आगमन हे साध्या पद्धतीने करण्यात आले. विशेष म्हणजे ऍड. वामनराव चटप (स्वतंत्र विदर्भ आंदोलन प्रनेते व माझी आमदार यांनी नववधूसह हातामध्ये “भारतीय संविधाना”चा ग्रंथ व आंब्याचे रोप देऊन प्रथम सुरुवात करण्यात आली . फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून लग्न विधीच्या कार्याला सुरुवात झाली.
सुधारीत मंगलाष्टके आणि फुलांच्या पाकळ्यांच्या अक्षता
नवरदेव प्रशांत खुटेमाटे यांचे मामा व वारकरी परंपरेचे कार्यवाहक श्री बाळकृष्ण बोबडे म्हणाले, “महात्मा ज्योतिबा फुले यांनी 134 वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांची सुरुवात केली. सत्यशोधक पद्धतीने विवाहाची एक चळवळ सुरू केली होती, आणि त्याच विचारातून आपण आपल्या भाच्याचा विवाह पुरोगामी आणि शिव,फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचाराच्या सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय घेतला होता,त्यानुसार रूढी परंपरांना फाटा देऊन हा विवाह सोहळा संपन्न केला आहे. तांदळाच्या अक्षता ऐवजी गुलाबांच्या फुलांचा वापर करून शेतकऱ्यांच्या फुलांचा वापर केला आहे. जेणे करून शेतकऱ्यांना तो फायदेशीर ठरेल आणि धान्याची नासाडी ही होणार नाही,” असा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वधू-वरांनी वृक्षांना पाणी घालून व निर्मिक पूजन करून शपथविधी घेतला आणि पारंपारिक मंगलाष्टकां ऐवजी सत्यशोधिकी मंगलाष्टके यावेळी उच्चारण्यात आले. असं पाटील यांनी सांगितले.
नवरीची अशी ही “ज्ञान रुपी” रुखवत
लग्नामध्ये रुखवत या विधीतून मुलीला माहेरच्या मंडळीकडून अनेक गोष्टी देण्यात येतात,त्यामध्ये त्याच्या नव्या संसाराच्या साहित्याचा समावेश असतो. याठिकाणी नववधूचे रुखवत हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. नवरदेव मंडळींकडून मुलीच्या कुटुंबियांना रुखवत मध्ये ज्ञानरूपी पुस्तके देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यावेळी नववधूपक्षाडून आणि आप्तेष्ट मंडळांनी अनेक थोर पुरुषांची पुस्तके यावेळी नववधूला रुखवत म्हणून भेट दिली. लग्न मंडपात पुस्तकांची ही ज्ञानाची रुखवत मांडण्यात आली होती.
वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान
या पुरोगामी, सत्यशोधक पद्धतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पाटील यांचे कडून या लग्नमंडपात देशसेवा बजावणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांचा आणि त्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला. देशसेवेच्या बद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि त्यामध्ये प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने यावेळी वीर जवानांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला.
इतिहास संशोधक कोकाटेनी लग्न सोहळ्याचे केले कौतुक
सामाजिक कार्यकर्ते, स्वतंत्र विदर्भ आंदोलन, शेतकरी आणि पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या दशरथ पाटील यांच्या मुलीच्या या”सत्यशोधक विवाह” सोहळ्यासाठी माझी आमदार
एड. वामनराव चटप यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.यावेळी बोलताना ते म्हणाले,”आजच्या पिढीला शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज असून या पद्धतीने लग्न पार पडल्यास अनेक अनिष्ट चालीरीतींना मूठ माती मिळेल,याशिवाय व्यर्थ खर्चाला आळा बसेल, त्यामुळे समाजाने सत्यशोधक विवाह पध्दतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.
तरुणांनो सत्यशोधक विवाह करा,नव वधू-वरांचे आवाहन
लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर सत्यशोधक पद्धतीच्या मार्गाने लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर नवदांपत्यांना लग्न सोहळा बद्दल आनंद व्यक्त केला आहे. नववधू असणाऱ्या प्राजक्ता यांनी प्रत्येक मुलीची इच्छा ही तिचं लग्न धुमधडाक्यात व्हावं, असं असतं पण माझं सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला,त्याचा मला खूप खूप आनंद होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केलं आहे.नवरदेव प्रशांत म्हणाले, आपल्या भूमितील थोर समाज सुधारक यांच्या प्रेरणेतून आपण सत्यशोधक विवाह आमचे सासरे श्री दशरथ पाटील आणि श्री बाळकृष्ण बोबडे मामाजी यांच्या माध्यमातून निर्णय घेतला. व हा विवाह सोहळा संपन्न झाला.त्या मला अतिशय आनंद होत आहे. प्रत्येक तरुणांनी सुद्धा आपल्या थोर पुरुषांनी आणि समाजसुधारकांनी जो संदेश दिला आहे,त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि या थोर पुरुषांना व समाजसुधारकांना श्रद्धांजली म्हणुन सत्यशोधक पद्धतीने विवाह केला पाहिजे ,असे आवाहन यावेळी नवरदेव प्रशांत खुटेमाटे यांनी केले आहे.
आर्थिक संकटातील आदर्श लग्न..!
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने जागृतीचे सामाजिक संदेशही देण्यात आले. झाडांची संख्या घटल्यामूळे, वृक्षलागवड हि लोकचळवळ व्हावी, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, म्हणून आंब्याचे रोप भेटवस्तू म्हणून देण्यात आले, आपल्या हक्काप्रती जागरुकता निर्माण होण्यासाठी “भारतीय संविधान” पुस्तक प्रत्येक पाहुण्यांना भेट देण्यात आले,शिवाय या सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनासारख्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळल्यामूळे समाजापुढे एक नवीन आदर्शही निर्माण झालेला आहे.
या लग्नसोहळ्याला शेतकरी नेते एड.वामनराव चटप(माजी आमदार राजुरा),
डॉ.भाऊ राजुरकर(संस्थापक,गेटवेल हॉस्पिटल, नागपूर) व सौ.विणाताई राजुरकर, श्री.रमेशजी राजुरकर (उद्योजक आणि राजकीय नेते, वरोरा) व सौ.मायाताई राजुरकर श्री.शांतारामजी राजुरकर, श्री.वसंतराव मुसळे,(सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर), श्री.अरुण पा.नवले,श्री.अविनाश टिपले(जेष्ठ साहित्यिक, चंद्रपूर), शिवश्री संतोष टोंगे सर, श्री.मनोहर बोबडे,श्री. देवराव पा.धांडे,(शेतकरी नेते,वणी),श्री.अनिल घाटे(नेते कम्युनिस्ट पक्ष,वणी), श्री.सतिश देरकर (शिवसेना,एकनाथ शिंदे गट), श्री.संजय निखाडे (शिवसेना,उ.बा.ठा.),प्रा.महेश जोगी, नागपूर, श्री.पारसमल खाबिया, अकोला, यांच्या सह शेकडो मान्यवरांनी लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शविली.













