दरवर्षी नवे पाठ्यपुस्तकांचा हट्ट; पालकांच्या खिशाला अतिरिक्त बोजा
प्रविण चिडे विरुर राजुरा तालुका प्रतिनिधी
🔰आजच्या आधुनिक शिक्षणाच्या स्पर्धेत प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेंट स्कूलकडे वळताना दिसत आहेत. मात्र या शिक्षणाच्या नावाखाली अनेक खासगी कॉन्व्हेंट शाळांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरांमध्येही दिसून येत आहे.

दरवर्षी नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच शाळांकडून नवीन पाठ्यपुस्तके,वह्या, गणवेश,शूज,बॅग,टाय, आयकार्ड अशा अनेक वस्तू खरेदी करण्याची सक्ती केली जाते.विशेष म्हणजे मागील वर्षीची पुस्तके व्यवस्थित असतानाही नवीन एडिशनच्या नावाखाली पुन्हा नवीन पुस्तके घ्यावी लागत असल्याने पालकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
अनेक कॉन्व्हेंट शाळांमध्ये पुस्तके बाहेरील दुकानातून न घेता थेट शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. शाळेकडून ठरवून दिलेल्या सेटमध्येच पुस्तके दिली जात असल्याने पालकांना पर्याय राहत नाही. बाजारात कमी किमतीत किंवा जुनी पुस्तके उपलब्ध असतानाही शाळेतूनच नवीन पुस्तके घ्यावी लागत असल्याने शिक्षणाचा खर्च अधिक वाढत आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे. शेती,मजुरी किंवा छोट्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांना एका मुलाच्या शिक्षणासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. दोन किंवा तीन मुले शिकत असतील तर हा खर्च आणखी वाढतो. त्यामुळे अनेक पालक कर्ज काढून किंवा इतर गरजा कमी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पालकांचे म्हणणे आहे की, काही शाळा दरवर्षी पुस्तकांचा अभ्यासक्रम किंवा पानांची रचना बदलून नवीन पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडतात. यामुळे जुन्या विद्यार्थ्यांची पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना उपयोगी पडत नाहीत.परिणामी दरवर्षी नवीन पुस्तकांचा खर्च करावा लागत असून पालक आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
शिक्षण विभागाने अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याची मागणी पालकांकडून होत आहे.जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर,पुस्तक बँक योजना आणि एकसमान अभ्यासक्रम राबविल्यास पालकांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. तसेच शाळांकडून अनावश्यक साहित्य खरेदीची सक्ती थांबविण्यासाठी शासनाने कठोर नियम लागू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिक्षण हे मुलांचे मूलभूत अधिकार असून ते सर्वांसाठी परवडणारे असावे, हीच सर्वसामान्य पालकांची भावना आहे.













