संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी 26 जानेवारीपासून सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेअंतर्गत सर्किट हाऊस, गडचिरोली येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गडचिरोली तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी आपल्या प्रलंबित विकासकामांच्या मागण्या व समस्या थेट डॉ. होळी यांच्या समोर मांडल्या.
या बैठकीत वसा–पोर्ला उपसा सिंचन गाळ्यास तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा, कोटगल उपसा सिंचन योजनेत समाविष्ट असलेल्या परंतु अद्याप पाणी न पोहोचलेल्या गावांची यादी तयार करून पीडीएन प्रणाली योग्य करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्यात यावेत, कोटगल उपसा सिंचन योजनेत वाकडी गावाचा समावेश करण्यात यावा, वाकडी–मसली उपसा सिंचन योजनेस तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, कुंभी व माडे मूल दरम्यान मोठ्या पुलाच्या निर्मितीस मंजुरी मिळवून द्यावी, कारवाफा प्रकल्पास मंजुरी मिळवून द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच झाडें समाजाच्या विविध प्रलंबित समस्यांना न्याय मिळवून देण्यात यावा, पांदन व मातोश्री रस्त्यांच्या अंदाजपत्रकात वाढ करण्यात यावी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (CMJSY) अंतर्गत बळीराज पांदन रस्त्याचे काम स्थानिक नागरिक व मजुरांना देण्यात यावे, तालुका क्रीडांगणास अग्रीम मंजुरी देण्यात यावी, गडचिरोली रिंग रोड प्रकल्पास मंजुरी देण्यात यावी, कणेरी येथील वैनगंगा नदी घाटावर अद्ययावत स्मशानभूमीस मंजुरी देण्यात यावी, मुरखळा–नवेगाव ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात यावे अशा मागण्याही मांडण्यात आल्या.
गडचिरोली–वडसा रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, 17 संवर्ग व पेसा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न सोडवण्यात यावा तसेच कोटगल बॅरेजसाठी शेतजमीन अधिग्रहित केलेल्या शेतकरी व नागरिकांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असून सिंचन, रस्ते, पूल, क्रीडांगण व मूलभूत सुविधा या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकरी, आदिवासी, कामगार व सामान्य नागरिकांच्या समस्या शासनाच्या विविध स्तरांवर प्रभावीपणे मांडून त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, तालुका महामंत्री मोरेश्वर भांडेकर, नवेगावचे उपसरपंच राजू खंगार, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष लोमेश कुळमेथे, तालुका महामंत्री रमेश नैताम, महिला तालुका अध्यक्ष किरण चाचणे, किसान आघाडी तालुका महामंत्री बंडू झाडें, कीर्ती मासुरकर, श्याम सलामे, अनिल शेडमाके, निलेश आत्राम, प्रफुल्ल कोडाप, सचिन भोयर, वामन जुनघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण अलामे, देवराव आलाम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सर्व उपस्थितांना नवीन वर्षाच्या डायरीचे वितरण करण्यात आले.








