नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुभाष साळवे मंडळ अधिकारी विरुर स्टेशन
प्रविण चिडे राजुरा तालुका प्रतिनिधी
विरूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध शासकीय कामांचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १४ मार्च रोजी विरूर स्टेशन येथील तेलगू शाळेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर मार्गदर्शन व तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.
या शिबिरात सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर, चावडी वाचन, तक्रारींचे निराकरण तसेच विविध महसूल विषयक अर्ज स्वीकारणे अशा अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
मा. डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासनाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ अधिकारी सुभाष साळवे, विरूर यांनी केले आहे.








