लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
निलंगा : निलंगा तालुक्यातील सरवडी, मुदगड एकोजी , हाडोळी परिसरात आज दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत गारांचा पाऊस पडला. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, गहू, हरभरा तसेच आंबा पिकांना फटका बसला आहे.
🗯दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि काही वेळातच गारपीट सुरू झाली. गारांच्या माऱ्यामुळे उभ्या पिकांची नासधूस झाली असून अनेक ठिकाणी ज्वारी व गव्हाचे पीक आडवे पडले आहे. हरभऱ्याच्या शेंगा तुटून पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे.
या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून आधीच बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.








