संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली .
गडचिरोली:–गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासी बहुल जिल्हा असून केंद्र सरकारने या जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे. अशा संवेदनशील भागात शिक्षणाच्या मूलभूत सुविधांचा अभाव असताना बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा (जि. गडचिरोली) ही संस्था सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करत आहे.
संस्थेच्या वतीने कुरखेडा तालुक्यातील १०० टक्के आदिवासी, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या तसेच नक्षलग्रस्त आंधळी गावात आंवान हायस्कूल, आंधळी फाटा (ता. कुरखेडा) ही शाळा सन १९९७ पासून शासनाच्या परवानगीने सुरू आहे. जंगलालगतच्या व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, हाच या शाळेचा मुख्य उद्देश आहे.

आंधळी गावाच्या आजूबाजूला असलेल्या सुमारे १० गावांमध्ये हिंस्त्र वन्यप्राण्यांचा मोठा धोका असल्याने विद्यार्थ्यांसाठी पायी किंवा साधनांविना शाळेत येणे अत्यंत जीवघेणे आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन बहुजन हिताय शिक्षण संस्थेने शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मोफत स्कूल बस सेवा सुरू केली आहे.
👉 विशेष बाब म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी व नेण्यासाठी संपूर्ण मोफत स्कूल बस सेवा देणारी ही एकमेव संस्था आहे.
👉 या स्कूल बस सेवेसाठी विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.
या मोफत व सुरक्षित वाहतूक सुविधेमुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली असून शिक्षणातील गळती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सातत्यपूर्ण संधी मिळणे हे या उपक्रमाचे मोठे यश मानले जात आहे.
यासोबतच संस्थेच्या वतीने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शूज, पाठ्यपुस्तके व नोटबुक्सचे वितरण देखील नियमितपणे करण्यात येत आहे, जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.
संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मोफत महा आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांमध्ये शरीराची संपूर्ण तपासणी, विविध रक्त तपासण्या, मोफत डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप तसेच आवश्यक लसीकरण करण्यात येते.
तसेच संस्थेच्या वतीने मुलींसाठी वसतिगृह चालविण्यात येत असून सध्या ४९ मुलींना राहणे, जेवण, शिक्षण साहित्य व इतर सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
वरील सर्व शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रमांसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. तरीही बहुजन हिताय शिक्षण संस्था स्वखर्चातून व लोकसहभागातून हे सर्व उपक्रम राबवत असून नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. या संस्थेचे अध्यक्ष कृपाल मेश्राम यांचे आंधळी परिसरातील पालक व विद्यार्थांनी अभिनंदन करीत आभार मानले.








