विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीचा संदेश; विरूर पोलिसांचा जनजागृतीपर उपक्रम
प्रविण चिडे विरुर राजुरा तालुका प्रतिनिधी
विरूर, ता. राजुरा:- अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांपासून युवक व विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी विरूर पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुनानक विद्यालय, विरूर येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अमली पदार्थांपासून दूर राहण्याची तसेच इतरांनाही नशेच्या विळख्यात जाण्यापासून परावृत्त करण्याची शपथ देण्यात आली.

अमली पदार्थांचे सेवन हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासोबतच त्याच्या कुटुंबावर आणि समाजावरही गंभीर परिणाम करणारे आहे. विशेषतः किशोरवयीन विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नशामुक्तीचा संदेश देण्यात आला. अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापेक्षा शिक्षण, क्रीडा, कला व सकारात्मक उपक्रमांकडे विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन करण्यात आले. व्यसनाची सुरुवात अनेकदा छोट्या सवयींपासून होते; त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यापासून दूर राहणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची, व्यसनमुक्त जीवन जगण्याची आणि समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याची शपथ घेतली. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला.
यावेळी मुख्याध्यापक धानोरकर सर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव पाला, मोरे सर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाला, उराडे सर, दवंडे सर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
विरूर पोलिसांच्या या जनजागृतीपर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.














