शासनाकडून अनाजाचा पुरवठा होत नसल्याने शालेय पोषण आहार योजनेवर परिणाम; जावेद माजीद यांचा आंदोलनाचा इशारा
प्रविण चिडे विरूर स्टेशन
देवाडा ता.राजुरा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना शासनाकडून आवश्यक अनाजाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने या योजनेला फटका बसत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असून पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेतात. शाळेत मिळणारे दुपारचे जेवण हे त्यांच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा पुरवठा खंडित झाल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर पोषणावर तसेच शाळेतील उपस्थितीवर होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
ही समस्या केवळ एका-दोन शाळांपुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनाजाचा साठा उपलब्ध नसल्याने शाळा प्रशासनासमोर विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना नियमित व पौष्टिक आहार मिळवून देणे हा आहे. मात्र, अनाजाचा पुरवठाच वेळेवर होत नसेल तर योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
लवकर अनाज पुरवठा न केल्यास आंदोलनाचा इशारा
शासनाने जिल्हा परिषद शाळांना तातडीने अनाजाचा पुरवठा करावा, अशी मागणी जावेद माजीद यांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात विद्यार्थ्यांवर हीच परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन योग्य नियोजन करावे आणि प्रत्येक शाळेला आवश्यक अनाजाचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. शासनाने लवकरात लवकर अनाजाचा पुरवठा करून विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार उपलब्ध करून द्यावा. अन्यथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा जावेद माजीद यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या पोषणाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून शाळानिहाय अनाजाचा साठा तपासावा आणि ज्या शाळांमध्ये अनाज उपलब्ध नाही त्या शाळांना तातडीने पुरवठा करावा अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.प्रशासन याबाबत कोणती तातडीची उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.














