ग्राहकांची मोठी गैरसोय नंबर लावूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
बाहेरगावाहून येणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे
प्रविण चिडे विरुर स्टेशन प्रतिनिधी
विरुर ता. राजुरा:- विरुर परिसरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी सिलिंडरसाठी नंबर लावूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने सनथ HP गॅस ग्रामीण वितरक, विरुर यांच्या वितरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असून, नंबर लावल्यानंतरही सिलिंडर उपलब्ध न झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः विरुर परिसरातील तसेच बाहेरगावाहून गॅस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सिलिंडर न मिळाल्याने निराश होऊन आपल्या गावाकडे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये रोष निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
घरगुती गॅस ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असल्याने त्याचा नियमित पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महिलांसह कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने नागरिकांना स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.

दरम्यान, सनथ HP गॅस ग्रामीण वितरक, विरुर यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन सिलिंडरचा पुरेसा व नियमित पुरवठा करावा, तसेच नंबर लावलेल्या ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध होईल, यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस वितरण केंद्रावर होणारी गर्दी आणि ग्राहकांची गैरसोय लक्षात घेता संबंधित वितरकांनी पुरवठ्याचे योग्य नियोजन, ग्राहकांना वेळेवर माहिती आणि नंबरनुसार वितरणाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.













