सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; केंद्र शासनाकडे संविधानिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी
प्रविण चिडे, विरुर प्रतिनिधी
विरुर स्टेशन : दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे सामाजिक संघटना, युवक-युवती, विद्यार्थी, पालक आणि जागरूक नागरिकांनी सोमवार (दि. २० जुलै) 11 वाजता शांततामय समर्थन रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्टँड चौक असा शांतता मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्यामार्फत केंद्र शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात देशभर चर्चेत असलेल्या कथित NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका गळती, विविध स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहार, शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, अपारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या कथित अन्यायाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी आंदोलन दडपून लोकशाही चालत नाही, लोकशाहीत मतभेदांना उत्तर संवादातूनच मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली. शांततामय आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक अधिकार असून, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून लोकशाही मार्गाने तोडगा काढावा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखावा आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या प्रसंगी सरपंच अनिल आलाम, उपसरपंच प्रीती प्रशांत पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सरिता रेड्डी, माजी सभापती प्रभाकर ढवस, सेवानिवृत्त प्राचार्य रमेश पायपारे, सुरेश पावडे, अजयानंद रेड्डी, फिरोज सय्यद, अजितसिंग टाक, विलास आक्केवार, ज्ञानेश्वर मोरे, बंडू उपरे, संगेश पावडे, प्रवीण चिडे, किसन हजारे, नामदेव चिडे, सचिन पिपरे, मोतीराम दोबलवार,शामराव कस्तुरवार,शाहू नारनवरे, अविनाश रामटेके,भूपेंद्र बोंडे, बाबुराव फाटले यांच्यासह महिला, युवक-युवती, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.















