भद्रावती बसस्थानकावर एसटी चालक-वाहकाचा उद्दामपणा
जाब विचारणाऱ्या प्रवाशाला ‘मेरे से मत खुजाओ’ म्हणत उद्धट उत्तर
चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर प्रतिनिधी : प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्येच प्रवाशांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी भद्रावती बसस्थानकावर घडला. बसचे हेडलाईट बंद असल्याचे कारण पुढे करत चालक व महिला वाहकाने तब्बल २० प्रवाशांना बसमध्ये न घेताच नागपूरच्या दिशेने बस दामटल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे एसटीच्या कारभारावर आणि प्रवाशांप्रती असलेल्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर बसस्थानकातून नागपूरकडे निघालेली एमएच १४ एक्सएल ८३४ क्रमांकाची एसटी बस शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजता भद्रावती बसस्थानकावर पोहोचली. यावेळी बसचे हेडलाईट बंद असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, बसमध्ये प्रवाशांना घेण्याऐवजी चालक व वाहकाने सुमारे २० प्रवाशांना बसस्थानकावरच सोडून दुपारी २.१० वाजता नागपूरच्या दिशेने बस रवाना केली.
👉प्रवाशांना का घेतले नाही, असा साधा प्रश्न एका प्रवाशाने चालकाला विचारला असता, सौजन्यपूर्ण उत्तर देण्याऐवजी चालकाने उद्धट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे.
‘आप अपने काम से मतलब रखो, मेरे से मत खुजाओ’ अशा शब्दांत प्रवाशाला सुनावल्याचे सांगण्यात येत आहे.
एसटी बस ही खासगी वाहन नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रवाशांच्या तिकीटाच्या पैशातून आणि त्यांच्या विश्वासातून एसटीचा कारभार चालतो. अशा परिस्थितीत प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, त्यांना बसमध्ये न घेणे आणि कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बस पुढे नेणे कितपत योग्य? असा संतप्त सवाल घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी केला.
एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते, असे सांगितले जाते. हेडलाईटमध्ये तांत्रिक बिघाड असेल तर तो दूरुस्ती करणे किंवा बस पुढे नेणे शक्य नसेल, तर प्रवाशांना स्पष्ट माहिती देणे आणि पर्यायी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला.
बसमध्ये प्रवाशांना न घेण्यामागे नेमके काय कारण होते, बसमध्ये आसनव्यवस्था किती होती, हेडलाईटचा बिघाड किती गंभीर होता आणि २० प्रवाशांना सोडून बस पुढे नेण्याचा निर्णय कोणाच्या निर्देशाने घेण्यात आला, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या प्रकारामुळे भद्रावती बसस्थानकावर काही काळ संतापाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित चालक व वाहकाच्या वर्तनाची चौकशी करून दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी, तसेच प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

प्रवाशांना सेवा देण्यासाठी धावणाऱ्या एसटीमध्येच प्रवाशांना ‘नकोसे’ ठरविले जात असेल आणि जाब विचारणाऱ्याला उद्धट भाषेत उत्तर दिले जात असेल, तर सामान्य प्रवाशांनी दाद मागायची तरी कुणाकडे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
भद्रावतीत नागपूर बसने २० प्रवाशांना न घेताच काढला पळ. जाब विचारणाऱ्या प्रवाशाला चालकाचे उद्धट उत्तर. चौकशी करून कारवाईची प्रवाशांची मागणी.














