✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदूर:-मौजा बाखर्डी येथील शेतकरी श्री. सुरेश उद्धव पानघाटे यांच्या सर्वे क्र. 109/1, 109/2 व 109/3 या शेताला मागील 15 वर्षांपासून महावितरणकडून विद्युत पुरवठा होत आहे. मात्र यावर्षी उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर वारंवार विनंती करूनही तो सुरू करण्यात आलेला नाही.
श्री. पानघाटे यांनी दि. 17 जून 2026 रोजी महावितरणकडे मिरची लागवडीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरू करण्याची लेखी विनंती केली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने वेळेत सिंचन करता आले नाही आणि मिरची लागवडीचे नियोजनच रद्द करावे लागले.
त्यातच दि. 29 जून 2026 रोजी शेताकडे जाणाऱ्या पाच विद्युत पोलवरील संपूर्ण वायरिंग चोरीला गेली. त्यामुळे शेताचा वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. एकीकडे पावसाने दांडी मारल्यामुळे पिके संकटात आली आहेत, तर दुसरीकडे वीज नसल्याने सिंचन करणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्याचे संपूर्ण शेती नियोजन कोलमडले आहे.
याप्रकरणी श्री. सुरेश पानघाटे 👉यांनी महावितरणकडे तात्काळ चोरीस गेलेली वायरिंग बसवून विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा होणाऱ्या सर्व आर्थिक नुकसानीस महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
💢स्थानिक शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
👇👇👇👇👇












