✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), चंद्रपूरच्या वतीने महिला जिल्हाध्यक्षा सौ. किरणताई गेडाम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांना जिल्ह्यातील जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणांमध्ये होत असलेल्या अवाजवी विलंबाबाबत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नागरिकांनी नियमानुसार अर्ज सादर करूनही अनेक जन्म व मृत्यू नोंदणीची प्रकरणे सहा महिने ते एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असून आर्थिक, मानसिक व प्रशासकीय त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जन्म व मृत्यू दाखले हे शिक्षण, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वारसा हक्क, मालमत्ता हस्तांतरण, बँक व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील सर्व प्रलंबित जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणांचा तातडीने आढावा घेऊन विशेष निवारण मोहीम राबवावी, सर्व प्रकरणांचा निश्चित कालावधीत निपटारा करावा, विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी प्रभावी नियंत्रण व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन सादर करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हंसराज वनकर, ॲड. मुरलीधर आमटे, ॲड. शैलेंद्र देशकर, किरण घाटे, रमेश अंबादे, रीमा सिंह, बिंदुताई गडलिंग, शांती राजू रॉय, तृप्ती कुळमेथे, अंजली काटवले, कविता शेडमाके, मंगला थेरकर आणि सुप्रिया गिरी हे उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.













