शिरपूर:-वणी तालुक्यातील जहांगीर–शिवणी (निर्गृडा) नदी पुलाजवळ रात्री १२ वाजल्यापासून पहाटेपर्यंत ४ ते ५ ट्रॅक्टरच्या साहाय्याने सर्रास बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांनी खुलेआम लुट सुरू केली आहे.
💢शिवणी गावामध्ये ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम सुरू असून, गावातच बेकायदेशीर वाळूची खुलेआम विक्री होत आहे. ही सर्व कारवाई मंडळ अधिकारी, तलाठी तसेच शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असताना संबंधित यंत्रणा नेमकी कुणाच्या आशीर्वादाने गप्प आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
⏯️शेकडो ब्रास वाळूची रात्रीच्या अंधारात वाहतूक
वाळू माफिया मुजोरीने डोके वर काढत दररोज रात्री शेकडो ब्रास वाळूची वाहतूक करत असून, शासनाच्या महसूलाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचे काम सुरू आहे. महसूल विभागाला जुमानण्यास हे माफिया स्पष्टपणे नकार देत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप
या बेकायदेशीर रेती चोरीमुळे नदी पात्राची नासधूस होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास, शेतकऱ्यांच्या जमिनींना धोका आणि सार्वजनिक रस्त्यांची दुरवस्था निर्माण झाली आहे.
तहसीलदारांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
ठोस कारवाईची मागणी
वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे बेकायदेशीर मार्ग तात्काळ बंद करावेत
जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्यांवर खड्डे करून वाहतुकीचे मार्ग उद्ध्वस्त करावेत
ट्रॅक्टर मालक व वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करावेत
महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न ?
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर स्थानिक नागरिक, शेतकरी व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासन आता जागे होणार की वाळू माफियांच्या तावडीत शासनाचा महसूल गडप होत राहणार?
हा प्रश्न संपूर्ण वणी तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.








