प्रविण चिडे राजुरा तालुका प्रतिनिधी विरुर
बापूनगर (सुब्बई) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज मंदिरात दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला.
सकाळी 5.30 वाजता दीक्षागुरू प्रेमसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा विधी वैदिक मंत्रोच्चारात संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
यानंतर सकाळी 8.15 वाजता दीक्षागुरू प्रेमसिंग महाराजांच्या हस्ते भोग-भंडारा तसेच होम-हवन कार्यक्रम बंजारा समाजाच्या रीतिरिवाजानुसार पार पडला. या कार्यक्रमास ग्रामस्थांसह आमंत्रित नायक-कारभारी, तसेच भाविक-भक्त पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दीक्षागुरू प्रेमसिंग महाराज यांनी संत सेवालाल महाराज व तपस्वी रामराव महाराजांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचे आवाहन केले. तसेच युवा वर्गाने आपल्या सोयीनुसार 21 किंवा 41 दिवसांचे व्रत धारण करून कोत्तापल्ली येथून पोहरादेवीकडे जाणाऱ्या ‘सेवा दल’ (संत सेवालाल महाराज महासंकल्प पदयात्रा) मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
सकाळी 10.00 वाजता महाआरती झाल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बापूनगर गावाचे नायक श्री. संतोष जितमल जाधव, कारभारी श्री. बळीराम चव्हाण, डाव श्री. पुनाजी राज्या जाधव, तसेच गावातील ग्रामस्थ व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.








