गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-भामरागड तालुक्यात बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन जण नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने बचाव मोहीम राबवत तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी (वय 40), अर्चना केये कुडयामी (वय 16) आणि अक्षरा केये कुडयामी (वय 3), सर्व रा. लाहेरी, ता. भामरागड यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गावाबाहेर गेले होते. दरम्यान, सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पमुलगौतम नदी व परिसरातील नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास नदीला मोठा पूर आला. त्याचवेळी लाहेरी येथील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने संबंधित तिघे नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडले होते.
सतत कोसळणारा पाऊस आणि वाढते पाणी यामुळे चारही बाजूंनी त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता.
सायंकाळी सुमारे 6.30 वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली. घटनेची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना देण्यात आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता एसडीआरएफ पथकाला बचावकार्यासाठी रवाना करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले.
या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांच्या पथकाने, लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व एसडीआरएफ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही जीव वाचविणारी मोहीम यशस्वी ठरली.













